कथास्थळी सुरक्षा,स्वच्छता उपाययोजनांची सज्जता ठेवा
जिल्हा प्रशासनाचे आयोजकांना निर्देश
अकोला : म्हैसपूर ता. अकोला येथे आयोजित शिव महापुराण कथा कार्यक्रमास जमणाऱ्या भाविकांच्या संख्येचा आयोजकांनी दिलेला अंदाज पाहता आयोजकांनी कथा स्थळी सुरक्षा, स्वच्छता उपाययोजना कराव्या, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने आज आयोजकांना दिले.
शिवमहापुराण कथा आयोजनासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आज जिल्हा नियोजन भवनात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन सागर तेरकर, म्हैसपूर सरपंच मिनाताई इंगळे, ग्रामसेवक आर. बी. अटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम दिनकर नागे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश जवादे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, तहसिलदार सुनिल पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने विजय दुबे व रुपेश चौरसिया तसेच त्यांचे अन्य सहकारी उपस्थित होते.
आयोजकांनी त्यांच्या वतीने दि. ५ पासून होत असलेल्या कथा कार्यक्रमाच्या तयारीची माहिती सांगितली. कथा कार्यक्रमास जमणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, जेवण, पाणी, स्वच्छता, अग्निशमन यंत्रणा, विद्युत यंत्रणा, मंडप उभारणी, वाहतुक व्यवस्था यासंदर्भात माहिती सादर करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोलीस यंत्रणा सुरक्षेच्या व वाहतुक नियमनाच्या दृष्टीने तैनात असेल. ३०० ते ३५० पोलीस जवान (महिला- पुरुष), अधिकारी तसेच २५० होमगार्ड (महिला पुरुष) तैनात असतील,असे पोलीस अधीक्षक घुगे यांनी सांगितले.
त्यांनी आयोजकांना सुचना केली की, सभा स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात यावा. भाविकांसाठी येण्या- जाण्याचे तसेच विविध सुविधांकडे जाण्याचे दिशादर्शक फलक लावणे आवश्यक असेल. तसेच भाविकांची गर्दी एकाच ठिकाणी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी प्रसाद वा अन्य काहीही वस्तू वाटप आदींचे आयोजन करु नये. जेवणाचेही स्टॉल्स अनेक ठिकाणी लावावे, जेणे करुन जेवणाच्या ठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये.
पिण्याच्या पाण्याची सोय ठिकठिकाणी असावी. कथास्थळी तयार होणारे अन्नपदार्थांचे नमुने अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तपासणी करतील. अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी सुचना केली की, अन्न शिजवून झाल्यानंतर ते कमीत कमी कालावधीत लोकांना वितरीत करावे. अन्न जास्त काळ ठेवू नये. तसेच दुग्धजन्य पदार्थांचा भोजनात समावेश करु नये.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले की, कथा मंडपाचे स्ट्रक्चरल ऑडीट करणे आवश्यक आहे. तसेच मंडपात केलेल्या अंतर्गत विद्युत व्यवस्थेचेही सुरक्षेच्या दृष्टीने ऑडीट करावे. सभा मंडप, स्वयंपाकाची जागा इ. ठिकाणी अग्निशमन संयंत्रे ठेवावी. अग्निशमन संयंत्र चालविण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन दलाकडून स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाईल. अन्न, पाणी यांचे नमुने तपासले जावे. तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था असावी. प्रशासनाच्या वतीने डॉक्टरांसह आरोग्य पथक, चार रुग्णवाहिका, अग्निशमन बंब, इ. उपाययोजना करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयोजक आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यासाठी मध्यवर्ती कक्ष कार्यान्वित करावा. तसेच आपत्ती व्यवस्थापन दलाची दोन पथके कथास्थळी तैनात असतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
कथा कार्यक्रमा दरम्यान रविवार दि.७ रोजी ‘नीट’ परीक्षा आहे. या परीक्षेचे केंद्र पातूर रोडवरील शाळेतच असल्याने परीक्षार्थी विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांची वाहने सुयोग्य पद्धतीने परीक्षा केंद्रात जातील याबाबत प्रशासनाने नियोजन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.